शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०
स्पर्शशब्द...
तुझ्या स्पर्शांचे शहारे
अजुनही माझ्या देही वाहतात..
मोहाचे ते वारे,
अजुनही मनाला मोहवतात...
वाळवंटातल्या मृगजळासारखे तुझे भास
तू समुद्र असुनही मला व्याकुळ करतात...
माझे शब्द अपुरे पडतात का रे??
की, तुला माझी हाकच ऐकु येत नाही..
वैशाखावणव्यासारखे माझ्या देहाचे आक्रोश,
तुझ्या देहाला त्याची झळही लागत नाही...
जळणं असं की कण कण जळावं लागतं...
राखही होत नाही..
राख झाले असते तर कदाचित कूणी उचलुन
तुझ्यासारख्या पाषाणाच्या
कपाळी फासली असती...
मनात जपुन ठेवलेले तुझे स्पर्श
कधीतरी मी देहावर घेते..
माझी आसवं पुसणारे,
माझे लाड करणारे,
माझ्या केसातुन फिरणारे,
मला सामावून घेणारे..
तुझ्या स्पर्शांचे सारे संभव, सारे आभास,
कधी ह्या सार्या व्यथा सरतील??
तरसलेल्या माझ्या देहावर
तुझ्या स्पर्शांच्या सरी कधी बरसतील???
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०१०
स्वप्नशब्द....
फार दिवसांपासुन उराशी जपलेली काही स्वप्ने
मी आज तुझ्याकडे घेउन आलेय..
माझ्या स्वप्नांचे अर्थ आजकाल मला उलगडत नाहीत...
काही स्वप्ने डोळ्यांतुन ह्रदयात उतरतात..
हळूच, मलाही चाहुल न लागता
तुझ्यासारखीच ती, तुझीच ती;
जसा तू माझ्या मनात उतरतोस
मला ही कळु न देता..
तुझ्या अस्तित्त्वाचं मला लागलेलं हे वेड सुटता सुटत नाही..
आणि ते कधी सुटु ही नये..
तुझं अस्तित्त्व, तुझी स्वप्ने, तुझी मी...
तुझ्यासारखं शब्दानी सजवणं मला जमत नाही..
तरीही शब्दांचा हा मोह मला आवरत नाही..
चल आता मला तुझ्यात सामवून घे...
आणि या शब्दांना समाधी दे..
माझ्या स्वप्नांचे अर्थ,
तू स्वप्नातच येवून दे...