RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

सटवी !



काल लोकलमध्ये तुझी ती
नकटी मैत्रीण भेटली,
आता हिला कटवायचं कसं
या विचारात असतानाच,
मेली माझ्या शेजारीच खेटली!

एक नंबरची नटवी!
नेहमी चावते रे सटवी!

उगाच इकडचे तिकडचे विषय झाल्यावर
नेहमीप्रमाणे तुझ्यावर आली!
कसा आहे गं तो? दिसला नाही बरेच दिवस!
फोन पण नाही त्याचा??

हिला काय करायचं असतं रे तुझ्याशी?
उगाच खेळत राहते मेली माझ्या जीवाशी!

साली, या ना त्या कारणाने
सारखं तुझं नाव घेत राहते.
मग तू असा, तू तसा,
सारखी मला जळवत राहते!

कधी कधी वाटतं आयला
हिला एकदा कोपच्यात घ्यावे
चांगले दोन तीन खवडे दयावे!

हसु नको साल्या, माहित आहे मला
आता तू मला समजावशील....
मी तुझाच आहे गं राणी,
बोलुन मला कवटाळशील!

काय तुझ्या त्या गवळणी?
आणि तू काय त्यांचा कान्हा?
दोन खवडे तुलाही देईन साल्या,
जर गेलास त्या सटवीच्या मागे पुन्हा!!

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

यशोधरेचे मनोगत



सार्‍या विश्वाची आसवे पुसणार्‍या हे सिद्धार्था,
कधी माझ्या पापण्यातले पाणी दिसले का तुला?
सार्‍या विश्वाला  प्रेमाने न्हाउ घालणार्‍या हे भगवान बुध्दा,
कधी माझं प्रेम कळलं नाही का तुला?

एका भयाण मध्यरात्री
माझा आणि बाळाचा त्याग करुन,
साधा निरोपही न घेता
तू निघुन गेलास!

तुला काय वाटलं मी चिरनिद्रेत होते?
त्या मोरपीसी शय्येवर सुखाने लोळत होते?
अर्धवट पापण्यानी मी तुला पाहत होते,
तुझी मुर्ती डोळ्यांतुन मनात साठवत होते!

तू थांबशील, मला पाहुन, निदान बाळाला पाहुन
माझी वेडी आशा, माझं वेडं प्रेम!
तुझं अखेरचं चुंबन!
मी तसंच जपुन ठेवलयं!
माझ्या केसांवरुन फिरलेला तुझा हात
मी तस्साच जपुन ठेवलाय!

तुझ्या चेहर्‍यावरचे विरहाचे दु:ख मला व्यथित करतेय!
एकदा अखेरचे तुझ्या मिठीत विरुन जावेसे  वाटते
माझी आसवेही तेव्हा तुझ्यासारखीच कठोर झालेली.,
माझे स्वरही तेव्हा तुझ्यासारखेच मुक झालेले.

पण बरं केलंस नाही निरोप घेतलास,
कदाचित मी तुझा निरोप घेउ शकले नसते!
माझ्या आसवांच्या नद्यानी तुझा मार्ग रोखला असता!
माझ्या प्रेमाच्या सागराने तुझ्या मनाला भरती आणली असती!

मी जाणते,
जेव्हा परत येशील तेव्हा तू माझा  सिद्धार्थ नसशील!
सार्‍या जगाला प्रेमाने भरुन टाकणारा बुद्ध असशील!
तेव्हा तू मला ओळखशील का रे?

जा!
विश्वाला तुझी गरज आहे!
भयाण्,गांजलेल्या, पिडलेल्या आत्म्यांना
तुझ्या मायेची गरज आहे!
पण,
.
.
.

मलाही तशीच आहे रे!

- इंद्रायणी
 

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

विरहशब्द - २


जुनी पाने चाळता चाळता
हरवलेल्या वाटा दिसत राहतात
ओळी काहिश्या पुसट झालेल्या`
तरी अजुन तुझी वाट पाहतात..

कूठल्याश्या वाटेवर सांडलेला पारिजात
अवचित देहभर पसरत जातो
तुझ्या असण्याचे भास
का मनाला देउन जातो

तू  दुर;
कुठे तरी हरवलेला
तोडुन स्वप्ने माझी
स्वत: विखुरलेला.

दिवसा मला भान नसत माझं
रात्र फार छळते रे!
तू  असावास ह्रदयाशेजारी
कण कण जेव्हा मी जळते रे !


रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

विरहशब्द !

                                              

काही स्वप्ने तुझी
घेउन फिरते मी अनवाणी
आठवांचा रुतता काटा
ह्रदय गाते विरहाची गाणी.

आठवणी अशा विशाल
आकाशासारख्या
थांग न लागणार्‍या
सागरासारख्या
नाचुन, बागडुन, थकलेल्या
वार्‍यासारख्या

कशी आवरु
कशी कुणाला
माझे मी नसते
तू  समोर नसताना!

कधी नव्हे ते शब्दांचे वेड
असे लावून मला,
एकाकी सोडलंस
स्वप्नांच्या मुलुखात मला.

कधी येशील परत
आता आभाळही कोरडे  झाले,
आसवांच्या माझ्या
असे विशाल समुद्र झाले!

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

बहुरुपी


                                                  नेहमी वेगवेगळी रुपे घेउन भुलविणारा
                                                  बहुरुपी तू !
                                                  माझ्या मनाला ही असचं
                                                  भुलवलंस ना?
                                                  कधी वारा, कधी पाउस,
                                                  कधी तारा, तर कधी
                                                 आकाश होउन!!!