RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

मीरा



अशी आर्तने मीरेची,
कधी पडली का तुझ्या कानी

होउनी धुंद, लाविला छंद
तुझ्या प्रीतीने माझिया मनी.

एक तुझीच मुर्ती, भरुनी नयनी
फिरते वैराणी, होउन दिवाणी.

जाहले सरिता, वाहिले जरी का
न मिळाली यमुना, तुझ्या प्रितीची.

राधा न जरी, श्रद्धा ही तरी
प्रेमावर माझ्या, माझीच सारी.

छेडुनि तारा, गायले तराणे
वाहिल्या धारा, संदिग्ध स्वराने.

होउनी वारा, जरा स्पर्शुनी जा ना
तरसली मीरा, जरा बरसुनि जा ना !

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

असं - तसं !




कधी रडणं, कधी हसणं.
कधी झुरणं, कधी सरणं.

कधी बोलणं, कधी गप्प राहणं.
कधी फुलणं, कधी कोमेजणं.

कधी बरसणं, तर कधी तरसणं.
कधी वाहणं, तर कधी गोठणं.

तुला आठवणं, तुला विसरणं.
तुला विसरुन पुन्हा आठवणं,

तुला आठवत जागणं, तुला आठवत झोपणं,
(नाही फक्त जागणंच!)

तुला बघणं, तुला मनात भरणं.
तुला हरवणं, तुला शोधणं.

तुला खुप काही सांगणं, तुझं काही ऐकणं.
तुला काही देणं, तुझ्याकडे काही मागणं,

तुझ्याशी भांडणं, अबोला धरणं.
तू मनवायला आल्यावर, जरा भाव खाणं.

तुझी वाट बघणं, तुला वाट बघायला लावणं.
तुझ्या डोळ्यांत डुंबणं, तुझ्या ओठांवर तरंगणं!

तुझ्या मिठीत जगणं, तुझ्या मिठीत मरणं.
तू असताना असणं, तू नसताना माझी मी नसणं!

काही नाही रे!
हे असं होतयं तुझ्या प्रेमात पडल्यापासनं! :)

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

जन्म!



आपल्या प्रत्येक भेटीत
एक नवा जन्म घेते मी.
तुझ्या मिठीत एक
नवे आयुष्य जगते मी.

जगण्याचे सारे नियम
बदलुन जातात,
जेव्हा तुझ्या डोळ्यांत
माझे डोळे मिसळून जातात.

कधीही न सुचलेले शब्द
मग ओठांवर येतात.
आणि तुझ्या ओठांवरुन
ओझरु लागतात.

काही जन्म असेच घ्यावे.
मरणही ज्यात नेहमी फुलावे.

वाटतं असं कधी तुला,
नेहमी एक जन्म द्यावा मला.
विसरुनी तुझी दुनियादारी,
एकदा बरसु दे डोळ्यातुन तुझ्या!

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

देहधून!





पांघरुन तुला देहावर माझ्या,
मोजते आभाळ डोळ्यातुन तुझ्या.

तू असा,निरंतर बरसणारा.
पारिजातक जणु नीरव विखुरलेला..

मैलाचे प्रवास क्षितिज शोधणारे,
तुझ्या माझ्या देहात सहज विरणारे.

चंद्र आज लाजुन विझलेला,
चांदण्यांच्या आड चिंब भिजलेला.

फुलांचे गंध, फुलताना फुलावे,
जसे माझ्या केसांत तुझे मन झुलावे.

असं तुझ्या मिठीत विसावसं वाटत,
विसरुन जगणं सारं, मरावसं वाटतं.

नको जाउ सोडुन मला अश्या सांजवेळी,
बहरत नाही नेहमी अशी रातराणी..

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

वादळ !



वादळ येतयं,
मी उभी किनार्‍यावर
वाळूत पाय घट्ट रोवून,
तुला माझ्या मनात ठेवून.

वादळ येतयं,
चोहोबाजुनी मला वेढतयं,
आठवणींना असं छेडतयं,
तुझ्यासाठी मन रडतयं.

वादळं येतयं,
लाटांचा मारा घेउन,
वार्‍याचा फेरा धरुन,
पावसाच्या सरी होउन.

वादळं येतयं,
समुद्राला उधाण भरतं,
रात्रीला भयाण करतं,
दिवसाला विराण करतं.

वादळं आलं,
मला भिरकावून दिलं
तुला गिरकावून दिलं,
आपल्याला दुरावून गेलं.

वादळं गेलं,
मी अजुनही किनार्‍यावर उभी
वाळूत पाय घट्ट रोवून,
तुझ्या मिठीत पुन्हा जगुन.

वादळं येईल
तुला माझ्यापासुन हिरावून नेईल,
पण तू असाच राहा,
वाळूत पाय घट्ट रोवून
तुझ्या मिठीत मला घेउन...